‘आमच्याकडील चावीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू…’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- राजकारणात चावी द्यावीच लागते. मग ते पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत की माजी मुख्यमंत्री. आम्ही आमच्याकडे असलेल्या चावीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, असा टोला लगावला होता. त्या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले. राऊत म्हणाले, राजकारणात टाळा आणि चावी दोन्ही महत्त्वाच्या असतात.

ज्याच्याकडं टाळं आहे, तो कुठल्याही गोष्टीला टाळा लावू शकतो आणि ज्याच्याकडं चावी आहे तो कुठलंही टाळं उघडू शकतो. आमच्याकडं चावी आहे. पक्षाचे आदेश असतात. सूचना असतात. त्यानुसार भूमिका मांडावी लागते.

आमच्याकडं चावी होती म्हणूनच आम्ही दीड वर्षांपूर्वी भाजपच्या सत्तेला टाळं लावलं आणि आमच्या सत्तेचं टाळं उघडलं,असा चिमटाही राऊत यांनी काढला. दानवे हे माझे मित्र आहेत. ते बऱ्याचदा विनोद करत असतात.

त्यांच्या शैलीचं मी नेहमीच कौतुक केले. कोल्हापूर इथं सुरू झालेल्या मराठा समाजाच्या मूक आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. ‘कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची भूमी आहे. तिथून सुरू झालेल्या आंदोलनाला राज्यातील सर्वच घटकांचा पाठिंबा व सहानुभूती आहे.

या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना साकडं घातलं आहे. मराठा समाजाच्या नेत्यांवर आंदोलनाची वेळ येऊ नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. त्यामुळं या प्रश्नावर केंद्र सरकार नक्कीच तोडगा काढेल,’ असंही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe