अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले येथील एका शिंदे कुटंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठ दिवसापूर्वी झालेल्या आईच्या निधनापाठोपाठ मुलीने देखील जगाचा निरोप घेतला आहे.
सुकृता शिंदे असे त्या मुलीचे नाव आहे. सुकृता हिने पत्रकारीतेमध्ये पदविका शिक्षण प्राप्त केलं होतं. विशेष म्हणजे सुकृता ही अकोले तालुक्यातील पहिली महिला पत्रकार आज तिने जगाचा निरोप घेतला आहे.
आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीने देखील या जगाचा निरोप घेतला. आता आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची दुःखद वेळ अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले येथील शिंदे कुटुबियांवर आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगमनेर महाविद्यालयात सुकृताने गेल्या वर्षी घवघवीत यश मिळविले होते. जागतिक महिला दिनावेळी आणि इतरवेळीही महिलांना कायदे विषयक जनजागृतीपर तिचे लेख प्रसिद्ध झाले होते. अकोले तालुक्यामध्ये पहिली महिला पत्रकार म्हणून ती वाटचाल करू लागली होती.
सुकृताने एम.ए मराठीचे देखील शिक्षण घेतले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने डी.एड अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तिने डी. एडची पदविका संपादन केल्यानंतर तिला पत्रकारिता विषयाची विशेष आवड होती. त्यामुळे तिने पत्रकारिता अभ्यासक्र पूर्ण केला.
सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही आठ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. माय-लेकीचा पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोलेकर सुन्न झाले आहेत. तिच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली.
सुकृता हिचे लग्न जमले होते. मध्यंतरी साखर पुडा झाला होता, तिचा होणारा पती आणि त्यांचे कुटुंब तिची काळजी घेत होते. रात्री तिची प्रकृती खालावली. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर देखील तिला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, पण तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
4 मे 2021 या दिवशी तिचा विवाह होणार होता. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विवाह पुढे ढकलण्यात आला होता. पण हातावर मेहंदी लागण्याआधीच ती सर्वांना सोडून निघून गेली.कोरोनामुळे लग्नाआधीच काळाने घाला घातला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम