मंत्री गडाखांच्या प्रयत्ननातून जिल्ह्यासाठी साडेसात हजार टन खत उपलब्ध होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जिल्ह्यातील खताची टंचाई लक्षात घेऊन नामदार शंकरराव गडाख यांनी आरसीएफ, नर्मदा व जीएसएफसी या प्रमुख खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क करून सविस्तर चर्चा केली.

त्यानंतर संबंधित कंपन्यांनी येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यासाठी 7 हजार 500 मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याने नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा खताचा प्रश्न सुटणार असल्याचे नामदार गडाख यांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, मका, सोयाबीन व ऊस पिकासह इतर पिकांसाठी गरजेनुसार युरिया खत उपलब्ध व्हावे म्हणून

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांनी काल (बुधवारी) नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क करून नेवासा तालुक्यास पुरवठा करण्यात आलेल्या एकूण खतामधून जो 691 मेट्रिक टन युरिया खताचा बफर स्टॉक केलेला आहे.

त्यातील 70 टक्के म्हणजे 483.70 मेट्रिक टन युरीया खत शेतकर्‍यांची खरीप हंगामातील पिकासाठी असलेली मागणी विचारात घेऊन तालुक्यातील परवानाधारक खत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली.

त्यामुळे नेवासा तालुक्यासाठी 483.70 मेट्रिक टन युरिया खत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सदरचे खत तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपल्या गावाजवळील अधीकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रामधून घेऊन जावे असे आवाहन नामदार गडाख यांनी केले आहे.

ना. गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना 483.70 मे. टन युरीया अधिकृत परवानाधारक खत दुकानदारामार्फत उपलब्ध होणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

तसेच जिल्ह्यासाठी 7 हजार 500 मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हि अत्यंत समाधानाची बाब आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe