अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- बिबट्यामुळे नगर तालुक्यातील निमगाव वाघा व नेप्ती गावात दशहत निर्माण झाली असताना, तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
यावेळी निमगाव वाघाचे ग्रामपंचयत सदस्य पै. नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, दुध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, अनिल डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद जाधव, दिलावर शेख, नेप्तीचे माजी सरपंच संजय जपकर, अतुल जपकर उपस्थित होते.
शहरालगत असलेल्या निमगाव वाघा येथील भगतमळा व नेप्तीच्या रानमळा भागात दोन मोठे व दोन लहान बिबट्यांचे वावर आहे. या भागाजवळ मोठ्या प्रमाणात वस्ती असून, शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी बाहेर पडत असतात. तसेच जनावरांच्या चार्यासाठी व शेतीच्या कामानिमित्त शेतात जावे लागत आहे.
सदर बिबटे चारा पिकांमध्ये दबा धरून बसलेले असल्याने शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी व त्यांच्या मुलांचे जीव गेल्याचे उदाहरण आहेत. या भागातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
सदरच्या बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने दोन पिंजरे लावले असून, बिबटे पिंजर्याकडे न जाता दुसर्या दिशेने बाहेर येतात. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झालेली आहे.
एखाद्याचे जीव जाण्यापुर्वी तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी निमगाव वाघा व नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम