आरोग्यमंत्री म्हणतात,मृत्यू लपवल्याचा आरोप सहन करणार नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- महाराष्ट्राच्या बाबतीत मृत्यू लपवले हे आरोप कधीही सहन करणार नाही. हे अत्यंत खोटं आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजेश टोपे यांनी राज्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी देखील राज्य सरकारच्या नियोजनाची माहिती दिली.

आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्र सरकारने किंवा आरोग्य विभागाने कधीही कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवले नसल्याचं सांगितलं. महाविकासआघाडीने मृत्यू लपवलेले नाहीत. देशात महाराष्ट्र अॅक्टिव्ह केसेसमध्ये आणि मृतांच्या बाबतीत क्रमांक एकवर होता.

ते आम्ही कधीही लपवलेलं नाही. महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढली होती. नव्या बाधितांचा आकडा ५० ते ६० हजार तर रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या ८०० ते ९०० पर्यंत गेल्याचं देखील काही दिवशी दिसून आलं.

याबाबत बोलताना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, कोरोनाचे मृत्यू लपवले हे आरोप मी कधीही सहन करणार नाही, ते अत्यंत खोटे आरोप आहेत. खासगी रुग्णालयांनी तिथे झालेल्या मृतांचे आकडे वेळेवर दिले पाहिजेत.

बऱ्याचदा खासगी रुग्णालयांकडून १५ दिवस आकडे उशिरा दिले जातात, हे याचं कारण असू शकतं. शिवाय, रिकन्सिलिएशनमुळे देखील मृतांची संख्या पोर्टलवर अपलोड झालेली नसेल. त्यामुळे ही संख्या कमी राहाते, पण ती लपवली असं होत नाही.

एकही मृत्यू लपवला जात नाही, असं ते म्हणाले. दरम्यान, यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गर्दीत विनामास्क फिरणाऱ्या लोकांची भिती वाटत असल्याचं सांगितलं. गर्दीची भिती नाही. ज्या पद्धतीने मास्कशिवाय लोक गर्दी करतायत, त्यांची मला जास्त भिती वाटते.

त्यामुळे तिसरी लाट अजून लवकर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने करोनाचे नियम पाळायला हवेत, असं ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe