अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना केवळ शासनाच्या नियमांचे योग्यरीत्या पालन करून राज्यासमोर आदर्श निर्माण करणारे कोरोनामुक्त गाव म्हणून हिवरेबाजारने नावलौकिक मिळवले होते. मात्र आता या गावासमोर एक मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
कोरोनामुक्त झालेले हिवरेबाजार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडले कि काय ? असा संभ्रम आकडेवारीतून निर्माण होऊ लागला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी गौरविलेल्या हिवरे बाजारवर पुन्हा करोनाचा शिक्का पडला आहे.
अर्थात एका जुन्या मृत्यूची राहून गेलेली नोंद आता घेण्यात आल्याने गावात पुन्हा करोनाचा रुग्ण सापडल्याचे कागदोपत्री दिसून येत आहे.त्याचे दुष्परिणाम आता करोनामुक्त गावांवर पुन्हा करोनाचा शिक्का पडण्यात होत आहेत.
प्रशासनाने केला खुलासा :- आदर्शगाव हिवरेबाजारने पुढाकार घेत करोनामुक्त गाव संकल्पना राबविली. त्यामुसार १५ मे रोजी गाव करोनामुक्त झाल्याची घोषणा केली. गुरुवारी (१७ जून) या गावात पुन्हा करोनाचा रुग्ण दाखविण्यात आला आहे.
प्रशासनाने खुलासा केला की, हा नवा रुग्ण नाही, तर जुनी मृत्यूची एक नोंद राहून गेली होती, ती आता घेतल्याने गावाच्या पुढे हा आकडा दिसतो आहे. दरम्यान करोनामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी जुळत नसल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
पोर्टलवर जाहीर होणारे आकडे, आरोग्य विभागाला कळविण्यात येणार आकडे यांचा मेळ बसत नव्हता. त्यानुसार राहून गेलेल्या नोंदी करण्याचे काम दहा जूनपासून सुरू झाले आहे. त्यामुळे जुन्या नोंदी आता केल्या जात असल्याने मृत्यूसह बाधितांचे आकडे वाढल्याचे दिसून येऊ लागले आहे.
प्रत्यक्षात करोनाची दुसरी लाट ओसरत असून सर्व ठिकाणी दिलासादायक परिस्थिती आहे. काही ठिकाणी रुग्णसंख्या कमालीची घटली आहे तर अनेक गावे करोनामुक्त झाली आहेत. आता जुन्या नोंदी घेतल्याने या गावांत करोनाबाधित रुग्ण असल्याच्या नोंदी दिसू लागल्याने गोंधळ उडाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम