अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील ग्रामपंचायतीचे वीजबिल थकल्यामुळे विद्युत मंडळाने सदर ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन कट केले आहे.
त्यामुळे मक्तापूर गावातील सर्व पथदिवे गेली दोन दिवसांपासून बंद असून गाव अंधारात बुडाले आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या दोन कूपनलिका देखील विजेअभावी बंद असल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
येत्या दोन दिवसांत या समस्या न सुटल्यास मक्तापूर ग्रामपंचायतीवर महिलांसमवेत हंडा मोर्चा काढण्याचा इशारा मक्तापुर शिवसेना शाखाप्रमुख गणेश झगरे व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मक्तापूर ग्रामपंचायतीचे सुमारे साडेचार लाख रुपये वीजबिल थकित आहे.
२०१९ साली ग्रामपंचायतीने अल्पशी रक्कम विज बीलापोटी भरली होती. त्यानंतर आजतागायत वीजबिल भरणा न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली आहे. या संदर्भात विद्युत मंडळाने ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही ही रक्कम भरली गेली नाही.
शेवटी नाईलाजाने विद्युत मंडळाने ग्रामपंचायतीची वीजतोड केली. मात्र यामुळे सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून विशेषतः महिला वर्गाची पाण्यासाठी मोठी कुचंबणा होत आहे.
या समस्या ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित दूर कराव्यात अन्यथा सोमवार दि.२१ जून राेजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा गणेश झगरे, साहेबराव साळवे, विशाल बर्फे यांसह शिवसैनिक व ग्रामस्थांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम