काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्याचा साठा जप्त ! तब्बल ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- काळ्याबाजारात विक्रीसाठी आणलेला रेशनिंगच्या तांदूळ व गव्हाचा मोठा साठा कोतवाली पोलिसांनी जप्त केला आहे.

शहरातील मार्केट यार्ड तसेच केंडगाव इंडस्ट्रीज इस्टेट अशा दोन ठिकाणी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकान व गोदामवर शनिवारी दुपारी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. कारवाईत धान्य व सहा वाहने मिळून सुमारे ४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी मार्केट यार्डमधील २ दुकाने व केडगाव येथील संबंधित गोडाऊन सील केले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सुरेश रासकर, संग्राम रासकर, आसाराम रासकर, व्यवस्थापक जालिंदर चितळे यांच्यासह दोन वाहन चालक आशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या कारवाईमध्ये पोलिसांनी ४१९ गोण्या तांदूळ व १२५ गोण्या गहू असा माल मार्केट यार्ड येथील दुकानातून जप्त केला. केडगाव येथील गोदामात १३२ गोण्या तांदूळ, २४७ गोण्या गहू व बारदाण्यात गहू भरलेल्या ४७ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत.

हा सगळा धान्यसाठा हरियाणा व मध्यप्रदेश राज्यातील रेशनिंगचा आहे, पोलिसांनी या धान्यासह रेशनिंग धान्याच्या रिकाम्या गोण्या, ४ ट्रक व एक छोटा हत्ती, एक पिकअप वाहन असा सर्व मिळून ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मार्केट यार्ड येथील सुरेश ट्रेडिंग कंपनी व सोहम ट्रेडीग कंपनी या दोन्ही दुकानावर आधी छापा टाकण्यात आला. हे दोन्ही दुकाने सुरेश रासकर यांच्या नावावर आहेत. पोलिसांनी या ठिकाणी मुद्देमाल हस्तगत करून त्या ठिकाणी असलेली बिलांची तपासणी सुद्धा सुरू केली आहे.

ही दोन्ही दुकाने सील करण्यात आली आहेत. मार्केट यार्ड येथील या दुकानांमध्ये कोतवाली पोलिसांनी १४ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला. याच वेळी पोलिसांनी व प्रशासनाच्या पथकाने रासकर यांच्या केडगाव इंडस्ट्रीजमध्ये असलेल्या गोदामावर छापा टाकून तांदळाच्या १३२ गोण्या,

२४७ गव्हाच्या गोण्या व ४७ आणखी गव्हाच्या गोण्या आशा सर्व मिळून ४१९ गोण्या जप्त केल्या. मार्केट यार्डमधील पावणे चारलाखांचे धान्य तर केडगावातील धान्य ४ लाखाचे असून दोन्ही मिळून सुमारे ८ लाखाचे धान्य तसेच सुमारे ३३ लाख रुपये किमतीची ६ वाहने जप्त करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe