अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- आमदार झाल्यापासून रोहित पवारांना ते स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय, त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजू नये.
त्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी टीका आ.गोपीचंद पडळकर यांनी केली. भाजप नेते आ.गोपीचंद पडळकर हे जामखेड तालुक्यात आल्यानंतर श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे दर्शन घेऊन गोयकरवाडी,

बावी येथे घोंगडी बैठक घेतल्यानंतर जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग २१ मध्ये बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आ. रोहित पवार हे पोस्टरबॉय आहेत. ते केवळ सोशल मीडियावर सक्रिय आहेत. मतदारसंघातील रस्ते खराब आहेत तिकडे लक्ष द्यावे.
माजी मंत्री राम शिंदे यांनी मंजूर केलेले कामेच अद्याप चालू असून त्याच कामाचे श्रेय ते घेत आहेत. काम करायला कधी कधी आणि श्रेय घ्यायला सर्वात आधी अशी त्यांची परिस्थिती आहे. योगेश चौरे या युवकाने आरोप केला आहे की, बारामती ॲग्रोच्या माध्यमातून निकृष्ट खाद्य कोंबडी पालक शेतकऱ्यांना दिले.
त्यामुळे कोंबडी अंडे देत नाही म्हणजे पवारांनी कोठेही पेरले तर तिथे घोटाळा उगवणार हे बारामती अँग्रोमुळे सिध्द झाले आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना पडळकर म्हणाले,
या सरकारमधील मंत्री त्यांचे खाते सोडून इतरांच्या खात्यावर बोलतात गृहमंर्त्यांचा विषय असला तर कामगार मंत्री बोलतात, शिक्षणमंर्त्यांचा विषय ग्रामविकास मंत्री बोलतात त्यामुळे यांच्यात ताळमेळ राहीला नाही. यांना जनतेचे घेणेदेणे राहिले नाही.
निर्णय कोणी जाहीर केला की थोड्यावेळाने कोणीतरी म्हणतेय आम्ही तसा निर्णय घेतला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण काय करतेय काहीच कळत नाही अशी टीका आ. पडळकर यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम