दूध उत्पादकांचा प्रश्न : स्वाभिमानी’ उतरणार रस्त्यावर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सद्यस्थितीत दुधाचा धंदा अत्यंत तोट्यात आहे. त्यामुळे दूधउत्पादक शेतकरी तीव्र संकटात सापडले आहेत. परिस्थिती गंभीर स्वरूपाची असताना याकडे पशूसंवर्धन व दुग्धोत्पादन खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नेवासा येथे सरकारचा निषेध करण्यात आला.

शेतकऱ्यांना तातडीने दुधाला १० रुपये प्रतिलिटर अनुदान द्यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेवासा शाखेमार्फत देण्यात आला आहे.

या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास कोरडे, जिल्हा प्रवक्ते डॉ. अशोकराव ढगे, जिल्हा उपाध्यक्ष दौलतराव गणगे, तालुकाध्यक्ष दादासाहेब नावदे, बापूसाहेब डावखर यांच्यासह पशूपालक व दुग्धउत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी डॉ. ढगे म्हणाले, दूध प्रश्नासंदर्भात अभ्यास करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी. पशू तज्ज्ञांच्या मते एक लिटर दूध तयार करण्यासाठी २८ रुपये खर्च येतो,

तथापि कोरोनाची खोटी कारणे देऊन सहकारी, खासगी व सरकारी दूध संघ प्रतिलिटर शेतकऱ्यांना २० ते २२ रुपये देऊन शेतकऱ्यांची लूट करत आहेत. काही दिवसांपूर्वी ३५ रुपये प्रतिलिटर भाव देण्यात येत होता,

अचानक कोसळलेल्या भावामुळे दूधउत्पादक मेटाकुटीला आला आहे. अंबादास कोरडे यांनी गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४० व म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ५५ रुपये भाव द्यावा, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांनी यासंदर्भात जागृत राहून दुधाला भाव मिळण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष दौलतराव गणगे, तालुकाध्यक्ष दादासाहेब नाबदे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe