अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून जामखेडमधील भाजी बाजार व शनिवारचा आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आठवडे बाजार त्वरित सुरू करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अनेक गोष्टींवर परिणाम होऊ लागले आहे. सर्वसामान्य शेतकरी व ज्यांचे हातावर पोट आहे, अशा व्यक्तींसाठी शनिवारचा आठवडे बाजार अत्यंत महत्त्वाचा आहे. आठवडे बाजार बंद असल्याने
शेतकऱ्यांचा भाजीचा माल अर्ध्या किमतीत व्यापारी खरेदी करतात. जनावरांचीही विक्री होत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे आठवडे बाजार चालू करून शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची मागणी आजबे यांनी केली.
तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले, तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत कोरोनामुक्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागणीची दखल घेऊन संबंधितांची बैठक घेऊन लवकरात लवकर आठवडे बाजार चालू करण्याची ग्वाही दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम