अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- हवेत विविध प्रकारचे सूक्ष्मकण असतात. धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे मिश्रण असलेले हे कण हानीकारक असतात.
या कणांना चिकटून कोरोना विषाणू फुप्फुसात प्रवेश करू शकतात, असे एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे. मुंबई आणि पुणे ही सर्वात संवेदनशील शहरे असल्याचे अभ्यासाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हवेत विविध प्रकारचे सूक्ष्मकण असतात. धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे मिश्रण असलेले हे कण हानीकारक असतात. यापैकी २.५ मायक्रॉनहून कमी व्यासाचे कण (पीएम २.५) अनेक आठवडे हवेत राहू शकतात.
फुप्फुसात प्रवेश करण्याइतका सूक्ष्म आकार असल्याने पीएम २.५ हे आरोग्यासाठी अधिक धोकादायक असतात. या कणांना चिकटून कोरोना विषाणू फुप्फुसात प्रवेश करू शकत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अभ्यासासाठी मार्च ते नोव्हेंबर २०२० या काळातील कोरोना बाधितांच्या संख्येचे निरीक्षण करण्यात आले तर पीएम २.५ उत्सर्जनाच्या प्रमाणाचे आधारवर्ष २०१९ गृहीत धरण्यात आले. संशोधकांमध्ये भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठाचे डॉ. सरोज कुमार साहू,
पूनम मंगराज, पुण्याच्या आयआयटीएमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ गुफरान बेग, शास्त्रज्ञ सुवर्णा टिकले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राऊरकेलाचे भीष्म त्यागी व आयआयटी भुवनेश्वरचे व्ही. विनोज सहभागी झाले होते.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात यांसारख्या पीएम २.५ची घनता अधिक असणाऱ्या राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण अधिक आढळून आले आहेत. प्रामुख्याने मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद ही शहरे अधिक बाधित आहेत.
महाराष्ट्रात वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्र हे पीएम २.५ उत्सर्जनाचे मुख्य स्रोत आहेत. पीएम २.५चे भारतात दुसऱ्या क्रमांकाचे (८२८.३ गिगाग्रॅम ) उत्सर्जन महाराष्ट्रात नोंदवले गेले.
उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर. ५ नोव्हेंबर २०२० पर्यंत महाराष्ट्रात १७.१९ लाख क रोना रुग्ण नोंदवले गेले. ही संख्या भारतात सर्वाधिक होती.
पीएम २.५च्या दरडोई उत्सर्जनात महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या पुढे आहे. संशोधनात सहभागी १६ शहरांमध्ये वाईट हवा गुणवत्ता दिवसांच्या यादीत मुंबई आणि पुण्याचा अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम