पारनेर : उद्योजक सुरेश धुरपते यांच्या आलिशान मोटारीतील ५५ लाखांच्या रोकड चोरीप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक जालन्याकडे रवाना झाले आहे.
बुधवारी पहाटे २.३० च्या सुमारास धुरपते यांच्या आलिशान मोटारीची (एम एच ४३ बी. एन. ४५४५) काच फोडून रोकड लांबवण्यात आल्याची फिर्याद धुरपते यांचे बंधू सूर्यभान यांनी दिली होती. सुरुवातीला रकमेचा तपशील न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
परंतु धुरपते यांनी कामोठे ( मुंबई) येथील तालुक्यातील एक पतसंस्थेच्या शाखेतून ७० लाखांची रोकड घेतली. त्यापैकी ५५ लाख घेऊन ते जामगावकडे निघाले. त्यांच्यासोबत चालकाशिवाय त्यांची बहीण होती.
मोटारीत मोठी रक्कम असल्याची व ती जामगाव येथे आल्यानंतर मोटारीतच ठेवण्यात आल्याची माहिती धुरपते याच्याव्यतिरिक्त केवळ चालकालाच होती. ही रक्कम जमिनीच्या खरेदीसाठी धुरपते यांनी आणली होती, अशी माहिती तपासात पुढे आली.
पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवल्यानंतर चालकाने साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची माहिती पुढे आली. तालुक्यातील पिंपळगाव तुर्क, तसेच श्रीगोंदे तालुक्यातील हे साथीदार असल्याचे समजल्यावर चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून साडेतीन लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली.
चालकासह ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांचे इतर साथीदार जालना येथे असल्याची व उर्वरित रक्कम त्यांच्याकडेच असल्याची माहिती देण्यात आहे.