दोघा सख्ख्या भावांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- दगड खाणीतल्या विहिरीतील पाण्यात बुडून दोघा सख्ख्या चिमुकल्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात घडली आहे.

समाधान जालिंदर भडांगे ( वय १२ वर्ष ) व सुरेश जालिंदर भडांगे ( वय १० वर्ष ) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. समधान भडांगे हा पाचवीत, तर सुरेश भडांगे हा तिसरीत शिकत होता, असे सांगण्यात आले.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या हृदयद्रावक दुर्दैवी घटनेने कौठेकमळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कौठेकमळेश्वर ते निळवंडे रस्त्यानजीकच्या खिंड शिवारात दगड खाणआहे. समाधान जालिंदर भडांगे व सुरेश जालिंदर भडांगे ही भावंडे शेळ्या पाणी पाजण्यासाठी खाणीकडे गेले होते.

दरम्यान शेळी पाण्यात पडली, तिला वाचविण्यासाठी समाधान भडांगे हा पाण्यात उतरला असता तो पाण्यात बुडाला. भाऊ पाण्यात बुडाल्याचे बघून त्याला वाचविण्यासाठी सुरेश भडांगे हा चिमुकला पाण्यात उतरला असता दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

सोबत असलेल्या काही मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी कौठेकमळेश्वर गावात घटनेची माहिती दिली.

त्यानंतर गावकऱ्यांनी खाणीकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी पाण्यातून दोघाही मुलांचे मृतदेह बाहेर काढले व घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe