कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका रस्त्यावर अचानक दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. अक्षरक्ष: रस्त्यावर पैशाची चादर पसरल्यासारखे दृश्य दिसत होते.
रस्त्यावर कोसळत असलेल्या या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. ज्याच्या हाताला जितक्या नोटा मिळाल्या, त्या घेऊन लोक पोबारा करत होते. कोलकाता येथील प्रतिष्ठित बिझनेस पार्कमध्ये असलेल्या एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नोटांचा पाऊस सुरू झाला.
आभाळातून पडत असलेल्या १००,२००,५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा पडलेला सडा उचलण्यासाठी रस्त्यावरच्या नागरिकांची एकच झुंबड उडाली. हाताला जितक्या नोटा मिळाल्या, त्या घेऊन लोक पोबारा करत होते. यावेळी नोटांची अनेक बंडलही खाली कोसळत होती.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २७ नंबरच्या बेंटिक स्ट्रीटवर एका प्रतिष्ठित बिझनेस पार्कमध्ये एम.के.पॉईंटच्या पाचव्या मजल्यावर एका कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयावर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)चे अधिकारी छापे मारण्याच्या हेतूने पोहोचले.
सदरचे अधिकारी पोहोचत असल्याची माहिती मिळाली त्यावेळी कंपनीत अवैधरीत्या बेहिशेबी पैशाची देवाण-घेवाण सुरू होती. छापा मारण्यासाठी अधिकारी आल्याचे समजताच कंपनीच्या लोकांनी वॉशरूमच्या दरवाजातून आणि खिडकीचा वापर करत नोटा फेकण्यास सुरुवात केली. यावेळी लोकांनी हाताला लागतील तितक्या नोटा घेऊन पोबारा केला आहे.