अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- बंधूंच्या घरी सत्यनारायणाच्या पुजेला गेलेल्या शिक्षकाच्या बंद असलेल्या घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी भर दुपारी दीड वाजता दोन लाख ५८ हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे.
ही घटना नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील जंगलेवस्ती येथे घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शिक्षक शिवाजी राजाराम जंगले यांनी सोनई पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.
शिरेगाव रस्त्यावर असलेल्या जंगलेवस्ती येथील राहत्या घराला कुलूप लावुन शिक्षक जंगले आपल्या भावाच्या घरी सत्यनारायण पुजा कार्यक्रमास गेले होते. त्यांची पत्नी अनिता दुपारी एक वाजता घराला कुलूप लावुन कार्यक्रमास गेल्या.
अर्ध्या तासाने त्या घरी येताच त्यांना दरवाजाचा कोंडा तुटलेला दिसला. घरात गेल्या असता लोखंडी कपाटाच्या लाॅकरमधील सोन्याचे आठ तोळ्याचे गंठन, सहा अंगठ्या व दोन कानातील डुल
तसेच रोख पंधरा हजार असा दोन लाख ५८ हजाराचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. जंगले यांनी तातडीने सोनई पोलिस ठाण्यात चोरीची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे,
सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी भेट देवून पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ञ पथकास बोलविण्यात आले.श्वान पथकाने जवळच्या रस्त्यापर्यंत माग काढला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम