अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- राज्य सरकारने जाहीर केलेले दीड हजार रुपयाचे अनुदान घरेलू कामगारांना तातडीने मिळावे, अनुदान मिळण्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून होण्याच्या मागणीसाठी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर भांडी घासून आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात सहभागी झालेल्या घरेलू मोलकरीण कामगारांनी भांडी घासून जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात संघटेनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, प्रमिला रोकडे, उषा बोरुडे, रेखा पाटेकर, अग्नीश अल्हाट, सुनंदा भिंगारदिवे,विमल मिरपगार, वंदना भिंगारदिवे, राजश्री बनकर, सविता बनकर, लता बनकर आदिंसह घरेलू मोलकरीण कामगार सहभागी झाल्या होत्या.
अहमदनगर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुमारे चार ते साडेचार हजार घरेलू कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेली आहे. राज्य सरकारने 30 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार पात्र असलेल्या घरेलू कामगारांना दीड हजार रुपयेची आर्थिक मदत मंजूर केलेली आहे.
टाळेबंदीनंतर सध्याची परिस्थिती पाहता घरेलू कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मदतीची तातडीने गरज आहे. शासन निर्णय जाहीर होऊन दोन महिने उलटून गेले आहेत.
तरीही आजतागायत ही मदत घरेलू कामगारांना मिळालेली नाही. त्यामुळे घरेलू कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
मात्र घरेलू कामगार महिला अशिक्षित व आर्थिक दुर्बल घटक असल्याने त्यांना कामावर सुट्टी टाकून सायबर कॅफेमध्ये जाऊन खर्च करुन ऑनलाईन अर्ज भरणे अशक्य आहे. सर्व माहिती सदर कार्यालयाकडे जमा असताना कार्यालयानेच घरेलू कामगारांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची गरज आहे.
यामुळे घरेलू कामगारांचे वेळ व पैसा वाचणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. 30 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार पात्र घरेलू कामगारांना दीड हजाराची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी, मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने करण्याची मागणी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम