कोरोनाच्या भीतीने धास्तावलेले नागरिकांची लसीकरणासाठी तुडुंब गर्दी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होऊ लागले आहे.

दुसरीकडे लसीकरण केंद्रामध्ये गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शासन स्तरावर या रोगाचा पादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहे.

मात्र, नागरिकांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र सध्या नगर शहरात दिसून येत आहे. करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका असल्याने नागरिकांनी लस घेण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे नगरच्या सर्वच लसीकरण केंद्रावर सध्या नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

त्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. महापालिकेचे लसीकरणाबाबत कोणतेही नियोजन नसल्याने विनाकारण गर्दी होत असल्याचे चित्र नगरमध्ये दिसत आहे. सोमवारी मनपाच्या तोफखाना केंद्रावर पहाटे सहापासून लोक लस घेण्यासाठी उभे होते.

सकाळी 9 वाजता लसीकरणाची वेळ जाहीर केलेली असली, तरी सव्वादहा पर्यंत लसीकरण सुरू झालेले नव्हते. गर्दीत वृद्धांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

तेथे बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना अक्षरश: खाली बसावे लागले होते. या गर्दीत अनेक लोकांनी मास्कही लावलेले नव्हते.

दरम्यान लसीकरण केंद्रावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या नागरिकांची मोठी गर्दी उसळत असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांना आवरण्याचे अतिरिक्त काम करावे लागत आहे.

या गर्दीमुळे लसीकरण केंद्रावर अडथळेही निर्माण होत आहेत. महापालिकेने या संदर्भातील नियोजन करण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe