अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- औद्योगिक विकास झाला कि गाव शहराचा विकास होणारच, त्याचबरोबर संबंधित परिसरात रोजगार देखील उपलब्ध होणार.
तसेच यामाध्यमातून आर्थिक चक्राला गती देखील मिळण्यास हातभार लाभतो. त्याच अनुषंगाने पारनेर तालुक्याच्या सुपा एमआयडीसीतील जपानी पार्कमध्ये पहिल्या कंपनीची एंट्री झाली आहे.
विस्तारित सुपा एमआयडीसीमध्ये जपानी पार्कसाठी स्वातंत्रपणे २१० एकर क्षेत्र राखीव ठेवण्यात आल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली. परंतु, जपानी उद्योग न आल्याने ही जागा तशीच पडून होती.
मात्र आता मित्सुबशी बेलटिंग इंडिया हा जपानी उद्योग ३०० कोटी रुपयांची येथे गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी २० एकर जागेचा ताबा २३ जून रोजी घेतल्याची माहिती एमआयडीसीचे भूसंपादन अधिकारी रमेश बेल्हेकर यांनी दिली.
तसेच सुप्याच्या विस्तारित एमआयडीसीमध्ये आतापर्यंत मिंडा, कॅरिअर मायडिया, केएसपीजी या तीन मोठ्या कंपन्या आल्या आहेत. त्यांच्या उत्पादन प्रक्रिया सुरू झाल्या आणि बऱ्याच तरुणांच्या हाताला स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला.
दरम्यान यापूर्वीही याठिकाणी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी रुची दाखवली होती. मात्र स्थानिक परिस्थितीबाबत मिळालेल्या माहितीने याकडे पाठ फिरवण्यात आली. नंतरच्या काळात थेट वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेतली गेली.
पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घातले व गुंडगिरी, दहशत यांचा बीमोड करण्यासाठी पावले उचलली. त्याचाच सकारात्मक प्रतिसाद म्हणून मित्सुबशी बेलटिंग इंडिया ही जपानी कंपनी ३०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. या कारखान्याच्या उत्पादन प्रक्रियेस सुरुवात होण्यास जवळपास दोन वर्षे लागणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम