अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- दुकान मालकिनीला भांडी दाखविण्यात गुंतवून ग्राहक बनून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रकमेसह सोन्याचे गंठण असा सुमारे १ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
भर बाजारपेठेतील दुकानातून दिवसाढवळ्या अशा प्रकारे चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना राहाता शहरात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहाता शहरातील वीरभद्र मंदिर परिसरात असलेल्या व्यापारी संकुलातील साईस्टील भांडार या दुकानात भांडी घेण्याच्या
बहाण्याने ग्राहक बनून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दुकान मालकिनीला विविध भांडी दाखविण्यात व्यस्त ठेवत गल्यातील ८४ हजार रुपयांची रोख रक्कम व ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण असा
सुमारे १ लाख २९ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी करून धूम ठोकली आहे. ही घटना सोमवारी दुपारी दीड ते पावणेदोन वाजेच्या दरम्यान भर बाजारपेठेत घडली.
घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रावसाहेब शिंदे आणि पोलीस हवालदार दिलीप तुपे यांनी घटनास्थळी भेट दिली.
दुकान मालक सीमा सोमनाथ कुंभकर्ण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम