अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणा-या बारी येथील ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी कळसुबाई शिखर काही कालावधीसाठी बंद ठेवले आहे.
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यातील सर्वात उंच कळसूबाई शिखर पुन्हा पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान कळसूबाई शिखराची समुद्रसपाटीपासून उंची 5400 फूट म्हणजे सुमारे 1646 मीटर आहे.
ट्रेकिंगचा छंद असलेल्या हजारो पर्यटकांची इथे रेलचेल असते. तसेच शिखरावर मंदिर असल्याने दर्शनासाठी गर्दी होते. मात्र, सध्या करोना विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात तिसर्या लाटेचा धोका आहे.
त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बाहेरून येणार्या लोकांसाठी कळसूबाई शिखर काही दिवस बंद राहणार आहे. कोरोनाचे रुग्णही सध्या शहरी भागात आढळून येत आहेत.
म्हणूनच खबरदारी म्हणून कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी तेथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने काही काळासाठी बंद ठेवले आहे. एव्हढेच नव्हे तर या नियमाचे उल्लंघन करणा-या पर्यटकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम