अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- अहमदनगर चाईल्ड लाईन आणि स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र यांनी चिकाटीने बालमातेच्या परिवाराचे केलेले समुपदेशन ,एका डॉक्टरची सजगता आणि पोलिसांची तत्परता, यामुळे बालमातेला न्याय मिळाला.
श्रीगोंदे तालुक्यातील एका गावात १६ वर्षाची मुलगी गर्भवती असल्याची कुणकुण स्नेहांकुर उपक्रमाच्या कार्यकर्त्यांना लागली. तालुक्यातीलच एका कर्तव्यदक्ष डॉक्टरांनी ही खबर दिली. मुलीच्या जीविताला धोका उद्भवू नये आणि त्या कुटुंबाला विश्वासार्ह मदत मिळावी ,
म्हणून डॉक्टरानी पुढाकार घेतला. स्नेहांकुर टीमने बालमातेच्या कुटुंबाशी संवाद केला. एका जवळच्या नातेवाईकानेच या मुलीस गर्भवती केले होते. 5 महिन्यांच्या गर्भवती मुलीमुळे तिचे कुटुंब दहशत आणि तणावाखाली होते.
काय करावे हे त्यांना समजत नव्हते. गर्भपात करण्यासाठी त्यांनी डॉक्टर आणि हॉस्पिटल शोधण्याचे केलेले प्रयत्न अपयशी ठरले. बदनामीला घाबरून सर्व कुटुंब जीवाचे बरे वाईट करण्याची भीती कार्यकर्त्यांना वाटली.
कायदेशीर कारवाई करण्याची त्यांची अजिबातच मानसिकता नव्हती. या कुटुंबाला आणि बाल मातेला सलग 3 दिवस स्नेहांकुर आणि चाईल्ड लाईन टीमने समुपदेशन दिले. त्यांच्या गावात जाऊन ,घरी थांबून आधार दिला.
त्यांना बाल न्याय अधिनियम आणि पॉक्सो (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक सुधारीत कायदा 2020 ) या कायद्यांची परिपूर्ण माहिती देण्यात आली. 3 दिवसांच्या अथक परिश्रमांनी कुटुंब कायदेशीर कारवाईला तयार झाले.
श्रीगोंदे पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात स्नेहांकुर आणि चाइल्ड लाइन टीमला यश आले. पोलिसांनी आरोपींस त्वरित अटक केली. तेव्हा पोलीस ठाण्यात जवाब देण्यासाठी आलेली बालमाता प्रचंड घाबरली .
तिला स्नेहांकुर टीमने सावरले. अहमदनगर जिल्ह्याच्या बालकल्याण समितीने बालमातेशी संवाद करून सर्व परिस्थिती आणि घटनाक्रम जाणून घेतला.
काळजी आणि संरक्षणासाठी या बालमातेस स्नेहालय संस्थेत दाखल करण्यात आले. मिळाले मधील कार्यकर्त्या बेबीताई केंगर आणि महिला समुपदेशकांनी या बालमातेची सर्व जबाबदारी स्वीकारली.
स्नेहालय टीमने या बालमातेस दर्जेदार वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन दिल्याने ही माता येथे स्थिरावली. बलात्कारित महिला किंवा बालमातांना त्वरित आणि नि:शुल्क मदतीसाठी ७७७००२७५०५ येथे संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम