अनधिकृत रुग्णवाहिका दान करून फसवणूक,आरटीओने नोटीस बजावून मागविला अहवाल!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- देवळाली प्रवरा नगरपालिका आणि शहराला कालबाह्य झालेल्या दोन अनधिकृत रुग्णवाहिका देऊन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेची व येथील नागरिकांची फसवणूक केली असून

मोटार वाहन कायद्यातील तरतुदी नुसार नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचेवर कायदेशीर कारवाई करावी या आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीरामपूरच्याच्या आर. टी. ओ. नी देवळाली प्रवरा नगरपालिकेला नोटीस बजावून अहवाल मागितला आहे.

या अनुषंगाने आमचे प्रतिनिधींशी बोलताना आप्पासाहेब ढुस म्हणाले की, कोरोना काळात काही रुग्णवाहिका चालक आणि मालक यांनी रुग्णांना अवाच्या सवा भाडे आकारून आपले उखळ पांढरे केले. व अजूनही ते नागरिकांना लुटत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत.

नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सवंग लोकप्रियतेसाठी व जनतेची सहानुभूती मिळविणेसाठी मोठा गाजावाजा करून गावाला नुकत्याच अनधिकृत रुग्णवाहिका अर्पण केल्या आहेत.

यातील एका रुग्णवाहिकेने देवळाली प्रवरा येथीलच एका गरीब नागरिकाला केवळ पन्नास किलोमीटर अंतरासाठी तब्बल अडीच हजार रुपये भाडे आकारून अक्षरशः रस्त्यात गाडी थांबवून लुटले असलेची तक्रार आमचेकडे प्राप्त झालेने आम्ही या विषयाच्या खोलात गेलो असता काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

मुख्य म्हणजे या अनधिकृत रुग्णवाहिका आऊट डेटेड झालेल्या आहेत. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या वाहनांची आर. टी. ओ. च्या दप्तरी साधे प्रवासी वाहन अशी नोंद आहे. रुग्णवाहिका म्हणून या वाहनांची कुठेही नोंद नाही. किंवा तसा परवाना नाही. त्यामुळे सत्यजित कदम यांनी सवंग लोकप्रियता आणि जनतेची सहानुभूती मिळविणे साठी भंगार मधून आऊट डेटेड झालेले

साधे प्रवासी वाहने विकत घेतली आणि त्यावर अनधिकृतपणे रुग्णवाहिका नाव टाकून, त्याला सायरन आणि दिवा लावून मोठा गाजावाजा करून ही भंगार वाहने गावाला आणि नगरपालिकेला अर्पण करून नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे.

अश्या भंगारातील आऊट डेटेड झालेल्या अनधिकृत रुग्णवाहिका मधून प्रवास करताना जर अपघात झाला तर त्यातील रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांचेसह त्या वाहन चालकाला कोणतीही सरकारी मदत किंवा विमा मिळू शकणार नाही.

तसेच फिटनेस नसलेले हे भंगारातील वाहन रुग्णाला वेगाने आणि वेळेत इच्छित ठिकाणी पोहच करू शकणार नाही. त्यामुळे आमचा स्पस्ट आरोप आहे की, देवळाली प्रवरा गावातील नागरिकांना भंगारातील फिटनेस नसलेल्या

व आऊट डेटेड झालेल्या अनधिकृत रुग्णवाहिका लोकार्पण करून नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी नागरिकांचा जीव धोक्यात घालून गावाची फसवणूक केली आहे. नगराध्यक्ष बेकायदेशीर कामे करत आहेत हे यावरून स्पस्ट होते आहेच परंतु मुख्याधिका-यांनी सुद्धा त्याकडे डोळेझाक करावी हे न समजण्यासारखे आहे.

नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी हे वाहन स्वीकारताना त्याची शहानिशा करणे गरजेचे होते परंतु त्यांनी कर्तव्यात कसूर करून एकप्रकारे नागराध्यक्षांच्या बेकायदेशीर कृत्याला प्रोस्थाहन दिले आहे.

तरी मोटार वाहन कायद्यातील तरतूदी नुसार श्रीरामपूरच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नागराध्यक्ष सत्यजित कदम यांचेवर तात्काळ कारवाई करावी व भविष्यातील संभाव्य धोक्यातून नागरिकांना वाचवावे अशी विनंती ढुस यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe