सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील हिरेवाडी येथे घडली. सपना सोमनाथ गेठे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

अवघ्या तीन महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता. सोमवारी रोजी ती घरातून बेपत्ता झाली होती. दि.३० जूनला हिरेवाडी नजीकच्या एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी मृतदेह तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात नेला.

जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यानंतर घारगाव पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

साकूर जवळ असलेल्या हिरेवाडी येथील सावळेराम लहानू खेमनर यांची कन्या सपना हिचा विवाह ९मार्च,२०२१ रोजी समनापूर येथील पांडुरंग गेठे यांचा मुलगा सोमनाथ याच्यासोबत झाला.

काही दिवसात गेठे कुटुंबियांनी पैसा व ट्रॅक्टरसाठी नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला. सुरुवातीला तिने हे सगळं सहन केलं,दिवसेंदिवस अत्याचाराचा प्रकार वाढत गेल्याने अखेर ती आपल्या माहेरी आली.

सोमवारी सदर विवाहिता आपल्या घरातून बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती आढळली नाही.

याबाबत हरवल्याची तक्रारही घारगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती विवाहितेचा सर्वत्र शोध सुरु असतानाच बुधवारी तिचा मृतदेह हिरेवाडीतील एका विहिरीत आढळून आला. नातेवाईकांच्या तक्रारीवरून सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe