शाळा हे मंदिर समजून, विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी विद्यादानाची आराधना केली -निता गायकवाड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका निता गायकवाड सेवानिवृत्त झाले असता, शाळेत आयोजित सेवापुर्ती कार्यक्रमात त्यांचा गौरवपुर्ण सत्कार करण्यात आला. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम व ज्येष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर यांच्या हस्ते गायकवाड यांना गौरविण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष विलास पेद्राम, विश्‍वस्त शंकर सामलेटी, राजेंद्र म्याना, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक रामदिन, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा, शिक्षक प्रतिनिधी प्रा. भानुदास बेरड, उच्च माध्य. चे समन्वयक प्रा.शिवाजी विधाते, कलाध्यापक नंदकुमार यन्नम,

ग्रंथपाल विष्णु रंगा, प्राथ. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्याल, श्रमिक नगरच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक दिपक रामदिन यांनी ज्येष्ठ अध्यापिका निता गायकवाड यांनी मार्कंडेय शाळेत 40 वर्ष सेवा देत असताना विद्यार्थी घडविण्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. ज्येष्ठ कलाध्यापिका आशा दोमल यांनी गायकवाड यांचा परिचय करुन दिला.

शिक्षकांच्या वतीने अर्चना साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, सर्वगुण संपन्न शिक्षक शाळेला मिळाल्याने गुणवत्तेचा आलेख वाढला. तर सर्वसामान्यांची मुले शिकून उच्चपदावर गेली.

मार्कंडेय शाळेने सर्वसामान्य कामगारांची मुले घडवली. यामध्ये शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट करुन निता गायकवाड यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.

ज्येष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर यांचा मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी निता गायकवाड यांनी नेहमीच पुढाकार घेतला. सहज व सोप्या पध्दतीने त्यांनी भाषा विषय शिकवला. आजही अनेक माजी विद्यार्थी त्यांच्या संपर्कात असून, त्यांनी केलेल्या कार्याची ही पावती असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना नीता गायकवाड म्हणाल्या की, शाळा हे मंदिर समजून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले. प्रमाणिकपणे व मनापासून विद्यादानाची आराधना केली. अनेक माजी विद्यार्थी समाजात उच्च पदावर काम करताना पाहून जीवनात समाधान मिळत असून, या शाळेने एक वेगळी ओळख निर्माण करु दिल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका खरदास यांनी केले. आभार प्रा. शिवाजी विधाते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe