अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- अनेकदा असा प्रसंग येतो आणि मग असे वाटते की आता सर्व काही संपलं मात्र अशा प्रकारच्या गंभीर प्रसंगातून देखील एखाद्या सहीसलामत बाहेर पडतो त्यावेळी आपण म्हणतो काळ आला होता पण वेळ नव्हती!
असाच काहीसा प्रकार नुकताच राहुरीयेथे घडला आहे. येथील रेल्वे स्टेशनजवळ भुयारी मार्गाच्या ठिकाणी काम सुरू असताना एक मजूर माती घसरल्याने मातीखाली गाडला गेला; मात्र त्याने प्रसंगावधान दाखवत नळीत शिरून बसल्याने तो वाचला.
याबाबत सविस्तर असे की, राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गाच्या ठिकाणी साचत असलेल्या पाण्याचा निचरा होण्याचे काम सध्या सुरू आहे. साधारण ३० फूट खोली करून त्यामध्ये नळी टाकण्याचे काम सुरू आहे.
पोकलेन व जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदला जात असताना सुजितकुमार यादव हा बिहार येथील मजूर खाली खड्ड्यातील माती बाजूला करण्याचे काम करत असताना अचानक वरून मातीची मोठी डगर खाली घसरली.
त्यामुळे काही समजण्याच्या आत हा मजूर मातीखाली गाडला गेला; परंतु वरील माती खाली घसरताना या मजुराने प्रसंगावधान दाखवत खाली असलेल्या साधारण तीन फूट रुंदीच्या नळीचा आश्रय घेतला.
तेथे उपस्थित असलेले इतर सर्व कामगार व आजूबाजूच्या युवकांनी त्वरित माती बाजूला उपसली. मात्र या सुमारे १० ते १२ मिनिटे सुजितकुमार यादव हा मजूर मातीखाली नळीमध्ये अडकून पडला होता.
माती बाजूला करताच त्याला उचलून बाहेर काढण्यात आले. अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला होता मात्र त्याला सहीसलामत बाहेर येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम