अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- शेतातील काम उरकून घरी जात असताना बिबट्याने हल्ला करून एकास ठार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथील झोळेकर वस्तीजवळ रात्रीच्या सुमारास घडला आहे.
संतोष कारभारी गावंडे (वय 45) असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ओकले तालुक्यातील धुमाळवाडी, धामणगाव आवारी आदी गावांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे शेळ्या, मेंढ्यांवर हल्ले सारखे सुरू आहेत.

ग्रामस्थांनी अनेकदा पिंजरा लावण्याची वनविभागाकडे मागणी केलेली आहे. अशातच धुमाळवाडी शिवारातील झोळेकर वस्तीजवळ धामणगाव आवारी रोड लगत शेतात संतोष कारभारी गांवडे (वय 45) हा शेतमजूर काम उरकून घरी जात असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढत उसाच्या शेतात नेवून त्याला ठार केले.
याबाबत पोलीस व वनविभागाला माहिती मिळाल्यावर वनाधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली व वन कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे.
दरम्यान धुमाळवाडी, धामणगाव आवारी गावात बिबट्याचा वावर वाढलेला आहे. संबंधित परिसरात पिंजरा लावण्याची वनविभागाकडे मागणी केलेली आहे.
हा बिबट्या नरभक्षक झाला असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. तरी वनविभागाने तात्काळ दखल घेत पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













