कर्जत :- पबजी गेम खेळण्याचा व्यसनातून कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील युवक सुयोग अरुण क्षीरसागर (वय 23) या तरुणाने जीव गमविला आहे.
मिरजगाव येथील व्यावसायिक अरुण क्षीरसागर यांचा मुलगा सुयोग याला गेल्या वर्षापासून पबजी गेमच व्यसन लागले होते. सुयोग हा सुशिक्षित तरुण होता. बारावीच्या शिक्षणा नंतर वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागला होता.
एक चांगला कुशल कारागीर बनला होता. गेली दोन वर्षांमध्ये अँड्रॉईड मोबाईल खरेदी करून इतर मित्राचे पाहून पबजी गेम खेळण्यास शिकला. इतर मित्राच्या बरोबरीने खेळतांना पाहुन त्यालाही हळुहळू पबजी खेळण्याचे व्यसन लागले.
दुकाना मधुन मोकळा वेळ मिळाला असताच तो पबजी गेम मध्ये व्यग्र असायचा. गेल्या पंधरा दिवसांपासून तो मनोरुग्ण अवस्थेत काहीही बोलत असे व गावामध्ये रात्रं दिवस फिरत असे.
आठ दिवसापूर्वी त्याचे पालक अरुण क्षीरसागर यांनी त्याला नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, अखेर त्याची प्राणजोत मालवली.
पबजी या मोबाईलवरील खेळाविषयी आपल्याकडे बऱ्यापैकी चर्चा होते. हा एक ऑनलाईन गेम असून हा खेळ खेळणाऱ्या व्यक्तीला स्वतःला जीवंत ठेवत दुसऱ्याला मारावे लागते. जो खेळाडू अशा तऱ्हेने जीवंत राहतो तो विजेता ठरतो.
हा खेळ खेळणारी व्यक्ती एका आभासी जगात वावरते मात्र यातील चित्रे अत्यंत वास्तवदर्शी असतात. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या जगातील भेद पुसट होतो.
या खेळामुळे खासकरून लहान मुले हिंसक बनल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदवले आहे. आतापर्यंत केवळ चर्चेच्या पातळीवर ही भीती आता वास्तवात उतरू लागली आहे.