अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- कर्जत पोलिसांच्या आवाहनानंतर तालुक्यात अवैध सावकारकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.आता सावकारकीच्या चौथ्या घटनेने सावकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
संदीप ईश्वर कळसकर(बदललेले नाव) (वय २७)रा. ता.कर्जत यांनी (दि.७ रोजी) दिलेल्या तक्रारीवरून आरोपी एजाज उर्फ गोप्या सय्यद (रा.कर्जत) याच्याविरुद्ध सावकरकी व इतर कलमान्वये कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने तसेच ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बंद झाल्याने संदीप कळसकर यांनी गाडीचे हप्ते भरण्यासाठी एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याकडुन ऑक्टोबर २०२० रोजी व्याजाने २ लाख रुपये घेतले होते.
मात्र त्या व्याजाचा दर हा एक लाखाला प्रतिदिन १ हजार रु.असा होता.त्यानंतरही ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने फिर्यादी कळसकर यांनी सय्यद याच्याकडून टप्प्याटप्प्याने दिड लाख रुपये घेतले.
या सर्व रकमेला लाखाला एक हजार रुपये याप्रमाणे व्याज द्यावे लागत होते.त्यानंतर आरोपीने व्याजाला चक्रीवाढ रक्कम लावल्याने मुद्देलची रक्कम ही ६ लाख रुपयांवर गेली. फिर्यादीने व्याजापोटी ३ लाख रुपये दिले.
३ लाखांची रक्कम देऊनही ९ लाख रुपये आणखी द्यावे लागतील असे आरोपीने सांगितले.आरोपी हा पैसे वसुल करण्यासाठी गाडी अडवून दमदाटी व शिवीगाळ करत होता.त्याने फिर्यादीच्या स्विफ्ट कारची नोटरी करून त्याच्याकडून २ कोरे धनादेशही घेतले.
‘माझी सध्या पैसे देण्याची परीस्थिती नाही माझे व्याज माफ करा, मी तुम्हाला मुद्दल टप्प्याटप्प्याने देतो’ अशी विनंती केली मात्र आरोपीने काहीही ऐकले नाही.आरोपीच्या त्रासामुळे फिर्यादीची मानसिक स्थिती खराब झाली होती.
त्यानुसार संदीप कळसकर यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन येथे गु.र.न.३२८/२०२१ भा.द.वि. कलम ३४१,५०४,५०६ तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,
पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, सचिन वारे यांनी केली असुन पुढील तपास पोलीस अंमलदार महादेव गाडे हे करत आहेत. पोलीस निरीक्षक यादव यांच्या मोहिमेने गोरगरीब,सर्वसामान्यांची होणारी लूट थांबली असुन नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कुणीही अवैध सावकारकी केली तर याद राखा!
‘कुणीही अवैध सावकारकी करुन कोणत्याही नागरिकाला वसुलीसाठी वारंवार फोन करणे,घरी येणे,शिवीगाळ करणे,वस्तु उचलून नेणे अगर इतर कोणत्याही प्रकारचा त्रास देत असेल तर याद राखा.
सावकाराकडून असा कोणताही प्रकार होत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करा.कोणत्याही तक्रारदारास सावकाराकडून कसलाही त्रास होणार नाही याची पोलीस काळजी असे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम