अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- संगमनेर तालुक्यात चार दिवसांत २२३ बाधित रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. नियमांचे पालन होत नसल्याने बंदच्या दिवशी सर्व आस्थापना सुरु आहे. सोनार, कपड्याचे दुकाने फक्त बंद दिसतात.
रस्त्यावरची वर्दळ कमी होताना दिसत नाही. प्रशासनाचे लक्ष नसल्याने कोरोना नियमांची पायमल्ली होत आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सरकारने कठोर निर्बंध लादले.

महिन्याभरात रुग्णसंख्या कमी होत असताना, आता पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे. ५ दिवस ४ वाजेपर्यंत तर २ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असताना त्यांचे पालन येथे होत नाही.
गर्दी आटोक्यात आणण्यात प्रशासन कमी पडत आहे. वचक नसल्याने खुलेआम दुकाने सुरु आहेत. नाशिक-पुणे महामार्गावरील घुलेवाडीत भाजी विक्रेत्यांनी वेळेची मर्यादा ओलांडली आहे.
४ वाजेची वेळ असताना सायंकाळी उशिरापर्यंत दुकाने थाटलेली असतात. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने गर्दी वाढत आहे. शहरातही तीच परिस्थिती असल्याने नेहरू चौक, सय्यद बाबा चौक, जोर्वे नाका, अकोले बायपास, मालदाड रोड व उपनगरात गर्दी दिसते. वाढत्या गर्दीमुळे कोरोनाला आमंत्रण दिले जात आहे.
दुसऱ्या लाटेत हलगर्जीपणामुळे प्रादुर्भाव वाढला. आरोग्य यंत्रणा कोलमडली. ऑक्सिजन व औषधांची कमतरता भासली. बेड उपलब्ध न झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. परिस्थिती समोर असताना प्रशासनासह नागरिकही बिनधास्त आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













