राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत फडणवीस बहुमत सिद्ध करतील : गडकरी

नागपूर : राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या दोघांचेही मी अभिनंदन करतो,  अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत फडणवीस बहुमत सिद्ध करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नागपुरात २९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी शनिवारी दुपारी पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंर्त्यांना बोलाविणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता गडकरी हसत हसत म्हणाले की, आधी मी या दोघांचेही अभिनंदन करतो. यापूर्वीच मी क्रिकेट आणि राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते, अशी प्रतिक्रिया दिली होती, त्याचा प्रत्यय आज आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर उपमुख्यमंत्रिपदाची अजित पवार यांनी आज शपथ घेतली आहे.
 हे दोघे मिळून राज्याला स्थिर सरकार देतील, विकासाचा रथ घेऊन पुढे जातील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. राज्यपालांनी जी मुदत दिली आहे, त्या मुदतीत बहुमत सिद्ध केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.