भोपाळ : भाजपा आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी आश्चर्यकारकपणे हातमिळवणी करून सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने मुंबईतील आपली ताकद दाखवून द्यावी.
प्रसंगी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी संयुक्तरीत्या रस्त्यावर उतरून लढा द्यावा. कारण या पक्षांपुढे आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी दिली आहे.
भोपाळ येथे पत्रकारांशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपाने अनपेक्षित खेळी करत सत्ता स्थापन केली आहे. यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर अजित पवार उपमुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आता सेनेने मुंबईतील स्वत:ची वट दाखवून दिली पाहिजे, असे ते म्हणाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने रस्त्यावर उतरून संघर्ष करणे गरजेचे आहे. त्यानंतर महाराष्ट्राची जनता नेमकी कुणासोबत आहे, हे सिद्ध होईल. सद्यस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना या तिन्ही पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.
भाजपाने केलेल्या सत्तास्थापनेचाही त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भाजपाने महाराष्ट्रात राज्यघटनेचा घोर अपमान केला आहे. गोवा, मेघालय आणि इतर राज्यांत भाजपाने बहुमत नसतानाही ओढून-ताणून सरकार बनवले. हाच कित्ता त्यांनी महाराष्ट्रात गिरवला, अशी टीका त्यांनी केली आहे.
अजित पवारांनी एकट्याने भूमिका घेत भाजपाशी हातमिळवणी केली. परंतु राष्ट्रवादीचा कोणताही आमदार भाजपासोबत जाणार नाही, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला आहे.