अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- गेल्या दीड वर्षांपासून जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना महामारीची पहिली लाट आणि दुसरी लाट येऊन गेली. आता तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिक बेफिकीर झाले असून या येणाऱ्या लाटेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
ही लाट म्हणजे हवामानाचा अंदाज नव्हे, अशी टिप्पणी करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी नागरिकांच्या बेफिकीरीबद्दल चिंता व्यक्त केली. बाजार आणि पर्यटनस्थळी लोक मोठय़ा संख्येने गर्दी करू लागले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हवामानाचा अंदाज पाहून लोक पर्यटनाचे बेत आखतात.
पाऊस सुरू होण्याआधी फिरून येतो, नंतर बाहेर पडता येणार नाही, असा विचार केला जातो. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतही लोक हाच विचार करत आहेत. दोन वर्षे घरात बसलो, आता तिसरी लाट येण्याआधी फिरून येतो, असे म्हणत लोक पर्यटनस्थळांवर गर्दी करत आहेत.
तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. हवामानाच्या अंदाजाप्रमाणे तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे पाहिले जात आहे, असे निरीक्षण केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत नोंदवले.
युरोपमध्ये पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू लागले असून, भारतातही तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तिसऱ्या लाटेबाबत व्यक्त होणारे अंदाज गांभीर्याने घेतले पाहिजेत, असे मत कोरोना कृतिगटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी मांडले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम