कळसूबाई शिखरावर जाणाऱ्या पर्यटकांना नवीन पर्यायी मार्ग मिळाला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पर्यटनासाठी अनेकजण अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखरावर जात असतात.

मात्र आता पर्यटकांचा मार्ग आणखी सोईस्कर होणार आहे. यामुळे पर्यटकांना अडथळे व समस्याविना शिखरावर जाता येणे शक्य होणार आहे. राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.

वन्यजीव विभागाने निसर्गाच्या सान्निध्यातून पांजरेमार्गे शिखरावर जाण्यासाठी नवीन रस्ता तयार केला. यामुळे कळसूबाई शिखरावर जाणाऱ्या पर्यटकांना नवीन पर्यायी मार्ग मिळाला आहे. त्यामुळे पांजरे येथील स्थानिकांच्या रोजगारात वाढ होणार आहे.

यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना हा पर्यायी मार्ग सुखकर ठरणार आहे. आजपर्यंत शिखरावर जाण्यासाठी बारी गावातून एकमेव रस्ता होता. हा रस्ता तीव्र उताराचा असल्याने पर्यटकांना आणि भाविकांना कसरत करावी लागत असते.

नवरात्र उत्सवात या रस्त्यावर बनविण्यात आलेल्या शिड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गर्दी कमी होण्यासाठी वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी मार्ग शोधला.

पांजरे येथील वनरक्षक संजय गिते यांना हा मार्ग सुचवला. गिते यांनी सहायक वनसंरक्षक रणदिवे यांना बरोबर घेत पर्यायी मार्ग शोधला. दरम्यान अवघ्या दीड महिन्यात जिल्हा वार्षिक योजनेतून अवघड ठिकाणी शिड्या आणि रीलिंग बनवून ग्रामस्थांच्या मदतीने हा नवीन रस्ता पूर्ण झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe