मुंबई :- राज्यातील सत्तापेचाचा निर्णय आणखी तसाच कायम आहे. तर देवेंद्र फडणवीस सरकारला आपली बाजू न्यायालयात मांडण्यासाठी आणखी 24 तासांचा अवधी मिळाला आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला असून त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झालीय.
१६२ आमदारांच्या सह्यांचं पत्र महाआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिलं. तसंच सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसं संख्याबळ असल्यानं आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी तात्काळ पाचारण करण्यात यावं, असं त्यांनी पत्राद्वारे सांगितलं आहे.
दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सरकार स्थापनेसाठी दिलेले आमंत्रण आणि त्यांचा शपथविधी बेकायदा असून राज्यपालांचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने रिट याचिकेद्वारे केली. यावर आज युक्तीवाद झाला. याबाबतच्या निर्णय उद्या येणार आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता निकालाबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे.