मयूरने जे केले ते कौतुकास्पदच आहे पण आता तो या जगात राहिला नाहीय….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  वीकेंड लॉकडाउन असूनही नगर शहरातील काही युवक शहराजवळील एका धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. तेथे तिघे जण पाण्यात बुडू लागले.

त्यातील एकाने एकेक करून तिघांना वाचविले. मात्र, शेवटी दम लागून त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मयूर परदेशी (रा. मोची गल्ली, नगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

रविवारी दुपारी शहरातील चौदा-पंधरा युवक विळद घाटातील गवळीवाडा येथील धबधब्यावर गेले होते. त्यामध्ये या चौघांचाही समावेश होता.

धबधब्याखाली हे सर्वजण पोहत होते. अंदाज चुकल्याने आणि पाण्याच्या वेगाने तिघे जण बुडत होते. हे पाहून परदेशी याने स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. बुडणाऱ्या दोघांना त्याने सुरक्षितपणे पाण्याबाहेर आणले.

त्यानंतर तिसऱ्याला वाचविण्यासाठी तो पुन्हा पाण्यात गेला. त्यालाही त्याने धोक्याच्या बाहेर आणून सोडले. मात्र, काठावर येईपर्यंत परदेशी याला धाप लागली. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. त्याला बुडताना पाहून इतरांनी आरडाओरड केली.

अन्य युवक मदतीला धावले. तोपर्यंत परदेशी पाण्यात बुडाला होता. त्याला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात त्याचे पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी रुग्णालयात त्याच्या मित्रांनी गर्दी केली होती. त्याच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करताना त्याच्या धाडसाबद्दल कौतुकही केले जात होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe