नवी दिल्ली : अयोध्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक असून त्यानंतर धैर्य व परिपक्वता दाखविणे स्वागतार्ह बाब आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नियोजित ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.
न्यायालयाचा निकाल देशाने सहजतेने स्वीकारला. आता देश नवी आकांक्षा व अपेक्षेसोबत दमदारपणे वाटचाल करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून मोदी म्हणाले की, देशात शांतता, एकता आणि सौहार्दाचे मूल्य सर्वतोपरी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राममंदिर प्रश्नावरून दिलेला निकाल जनतेने उदारपणे स्वीकारला आहे. समाजाने शांतता कायम ठेवली.
धैर्य, संयम आणि परिपक्वतेचे दर्शन घडविले आहे. त्याबद्दल मोदींनी जनतेला धन्यवाद दिले आहेत. एकीकडे, राममंदिर प्रश्नी प्रदीर्घ कायदेशीर लढाई संपुष्टात आली आहे तर दुसरीकडे, न्यायपालिकेप्रती देशात आदर आणि सन्मानाची भावना वाढीस लागली आहे.
खरे पाहता राम मंदिराचा फैसला हा न्यायपालिकेसाठी मैलाचा दगड सिद्ध झाला आहे. या निकालामुळे देश व न्यू इंडियाच्या भावनेला जनतेले अंगिकारल्याचे स्पष्ट झाले आहे. शांतता, एकता व सौहार्दासोबत जनतेने पुढील वाटचाल करण्याची गरज आहे. ही माझी आणि सर्वांची इच्छा आहे, असे मोदींनी पुढे बोलताना सांगितले.