भोपाळ: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते कैलाश जोशी यांचे रविवारी एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते.
रविवारी सकाळी भोपाळ येथील बन्सल रुग्णालयात वडिलांचे निधन झाल्याचे स्पष्ट करत हाटपिपल्या या त्यांच्या मूळ गावी सोमवारी सकाळी अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र व राज्याचे माजी मंत्री दीपक जोशी यांनी दिली. कैलाश जोशी यांचा जन्म १४ जुलै १९२९ रोजी झाला होता.
त्यांनी १९७७ ते १९७८ या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. राज्यात जनसंघ व भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
त्यांच्या पश्चात तीन मुले व तीन मुली आहेत. त्यांच्या पत्नीचे निधन काही महिन्यांपूर्वी झाले. जोशी मध्य प्रदेशच्या विधानसभेत ८ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.