पुणे : पिंपरी परिसरातील चिखली रूपीनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, त्याने चावा घेतल्याने १५ ते २० जण जखमी झाले आहेत. रविवारी (दि. २४) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर वायसीएम तसेच इतर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
गेल्या चार दिवसांपासून कुत्रा परिसरात फिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वीर सचिन सोळंखे (वय ३, रा. रूपीनगर), रोहित संजय मोरे (वय १२, रा. रूपीनगर) यांच्यासह १५ ते २० जण जखमी झाले आहेत.
यापैकी सात जणांवर वायसीएम रुग्णालयात तर, इतरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रूपीनगर चिखली परिसरात गेल्या चार दिवसांपासून पिसाळलेला कुत्रा फिरत आहे. यापूर्वी त्याने अनेकांवर हल्ले केले आहेत.
रविवारी दुपारी काही लहान मुले अंगणात खेळत असताना भटक्या कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. तसेच, खेळत असणाऱ्या मुलांचा लचका तोडला.
यामध्ये वीर हा गंभीर जखमी झाला असून त्याला सहा टाके पडले आहेत. त्यानंतर कुत्र्याने परिसरातील इतर नागरिकांवरही हल्ला केला असून त्यांच्यावर जवळील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.