अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- राहुरी पोलिस ठाणे हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांच्या टोळीवर पोलिसांनी झडप घातली.
यावेळी एका जणाच्या मुसक्या आवळल्या तर चारजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. ही घटना दिनांक २० जुलै रोजी घडली आहे. दिनांक २० जुलै रोजी रात्री १० वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ ते देवळाली प्रवरा जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर बाळासाहेब जगन्नाथ निमसे यांचे घरा जवळ अज्ञात पाच दरोडेखोर संशयीत रित्या फिरत होते.
सदर घटनेची खबर मिळताच पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार टिक्कल, हवालदार प्रभाकर शिरसाठ, पोलिस नाईक जानकीराम खेमनर, अमोल पडोळे गणेश फाटक, ठोंबरे आदि पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.
यावेळी त्या ठिकाणी अज्ञात पाच दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहून दरोडेखोर पळू लागले. चार अज्ञात दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. मात्र पोलिस पथकाने एकाला पकडले.
तेव्हा त्याने त्याचे नाव सलीम महम्मद हनीफ शेख राहणार गुलशनबाद, ता. मालेगाव असे सांगितले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून मिरची पूड, स्क्रू ड्रायव्हर व लोखंडी टामी असा मुद्देमाल मिळुन आला.
आरोपी सलिम शेख याला आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत असून पसार झालेल्या चार दरोडेखोरांचा पोलिस शोध घेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम