‘हे’ सत्तेला चिकटलेले अन गांभीर्य नसलेले सरकार …! भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांची टीका

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  मराठा आरक्षण असो, ओबीसींचे राजकीय आरक्षण असो अथवा सध्याची पूर परिस्थिती असो राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याच विषयी गंभीर नाही. सत्तेला चिकटलेले हे तर गांभीर्य नसलेले सरकार आहे, असे टीकास्त्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सोडले आहे.

महापुराची परिस्थिती असताना मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, मंत्री झोपा काढत आहेत काय ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच अन्य एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना “पंकजा मुंडे कोणावरही नाराज नाहीत.

“असेही ते म्हणाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील हे काल अहमदनगरमध्ये पक्षाच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री भाजपाचे दिवंगत नेते दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

तसेच येथील आनंदऋषी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत आदरांजली वाहिली. यावेळी पत्रकारांशी पाटील यांनी संवाद साधला. पूर स्थितीकडे निर्देश करीत पाटील म्हणाले,  २०१९ मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा येथे प्रचंड पूर आला होता.

तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर मी महसूलमंत्री होतो. आम्ही जीवापाड परिश्रम घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतरही आमच्यावर टीका करण्यात आली. त्यावेळी चंद्रकांत पाटील कुठे आहेत अशी विचारणा करणारे सध्याचे मंत्री कुठे आहेत ?,पूर परिस्थितीचे राजकारण आम्ही करीत नाहीत.

मात्र कोल्हापूर जिल्ह्याला तीन मंत्री आहेत. हे तिन्ही मंत्री झोपा काढत आहेत का ? कारण कोल्हापूरची कोरोना रुग्णसंख्या अजून कमी होत नाही. महापूर स्थिती निर्माण झाली आहे. आम्ही फक्त बघत बसायचे काय ?

असा सवाल करीत केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी आम्ही पाठपूरावा नक्की करू.मात्र राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करणार आहात ?,असे पाटील म्हणाले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे वक्तव्य नुकतेच केले. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजा मुंडे या कोणावर नाराज नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News