चालकाला मारण्याची धमकी देऊन कार पळवली

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा : गावाकडे नातेवाईकाचा मृत्यू झाला असून, श्रीगोंद्याला जायचे आहे असे सांगून हडपसर येथून स्वीफ्ट कार भाड्याने घेऊन आलेल्या तिघा इसमांनी कारचालकाला श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू ते गार रस्त्यावर गार फाटा येथे गळा आवळून जीवे मारण्याची धमकी देत.

रोख रक्कम, मोबाईल व कार असा एकूण ५लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सदर रस्ता लुटीबाबत कार चालक बळीराम नारायण झिटे यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. झिटे हे त्यांच्या नातेवाईकाच्या स्वीफ्ट कारवर चालक म्हणून पुणे येथे नोकरी करतात.

दि.२३ रोजी रात्री अकरा वाजता झिटे हे कार घेऊन मगरपट्टा, हडपसर येथे उभे होते. तेव्हा तीन इसम त्यांच्याजवळ येऊन आमचा नातेवाईक मयत झाला असून, आम्हाला श्रीगोंद्याला जायचे असल्याचे सांगून गाडी भाड्याने ठरवली.हे तिन्ही इसम कारमध्ये मागच्या सीटवर बसले.

रस्त्यात एका पंपावर डिझेल टाकून दौंडमार्गे काष्टीकडे येत असताना या इसमांनी चालकाला बहिणीला गावातून घ्यायचे आहे असे सांगून निमगाव खलूमार्गे गाडी घेण्यास सांगितली.

गाडी गारफाटा येथे आली असता यातील एका इसमाने मला लघुशंका करायची असे सांगून गाडी थांबवण्यास सांगितली. दोघे इसम लघुशंका करून आल्यावर गाडीत बसताना एका इसमाने चालकाच्या गळ्याला पाठीमागून दोरी टाकून दोरी आवळण्याचा प्रयत्न केला.

तसेच चालकाला धमकी देऊन जबरदस्ती खाली उतरवून दिले.तसेच त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल तसेच कार घेऊन पळ काढला. या चालकाने जवळच एका वस्तीवर जाऊन तेथील लोकांच्या मदतीने पोलिसांना सदर घटनेबाबत माहिती दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment