अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- खरीप पिके पाण्यावर असताना वीज वितरण कंपनीने थकीत बिलांसाठी कुठल्याही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये, अन्यथा त्याविरुद्ध रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल, असा इशारा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिला अाहे.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली अाहे. खरीप हंगामात जुलै महिना संपला तरी पाऊस नाही. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण झाली आहे. विहिरीच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी कडवळ, हिरवा चारा पिके घेतली.
तर काहींनी अल्प पावसावर खरीप पिकांची पेरणी केली, ही पीकांना पाणी हवे आहे. मात्र थकित बिलांमुळे वितरण कंपनीने रोहित्र खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी शेतकऱ्यांना पाणी असूनही पिकांना देता येत नाही.
मतदारसंघातील उर्वरित विजेच्या समस्याबाबत आपण नाशिक येथील मुख्य अभियंता, संगमनेरचे कार्यकारी अभियंता व कोपरगाव उपअभियंता यांच्याशी प्रत्यक्ष बोलणी करून ह्या समस्या त्यांच्या कानी घातल्या आहेत.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या प्रश्नात प्राधान्याने लक्ष घालावे व कुठल्याही वीज रोहित्रांचा पुरवठा खंडित न करणेबाबत संबंधितांना तात्काळ सूचना कराव्यात. अन्यथा येथील नागरिक व शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम