रानडुकरांच्या कळपाकडून उसाचे होतेय प्रचंड नुकसान !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात सध्या रानडुकरांच्या कळपाकडून उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. वेळवर झालेल्या पावसाने आणि मोठ्या कष्टाने जीवापाड जपलेल्या पिकांची नासाडी वन्य प्राण्यांकडून केली जात असल्याने बळीराजा संकटात आहे.

मागील वर्षी भरपूर झालेल्या पावसांमुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने यंदा परिसरात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली. चांगली तरारून आलेली पिके नष्ट होत आहेत. आधीच शेतीत केलेला खर्च कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निघेनासा झाला असून त्यात या रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त असून रानडुकरांचा बंदोबस्त करून झालेली नुकसानभरपाई वन विभागाने द्यावी, अशी मागणी होत आहे.

बोधेगाव परिसर कायम दुष्काळी व शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला भाग आहे. मात्र मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. याचा फायदा उठवत शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. इतरांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार कपाशी, बाजरी, तूर, मूग, सोयाबीन, मका, ही चारा पिके घेतली. शेतकऱ्यांनी महागडी बी-बियाणे, रासायनिक खते, मशागत करून आपली पिके मोठ्या कष्टाने जोपासली.

दहा-पंधरा कांड्यावर असलेल्या उसाचा उत्पादन खर्च महागाईमुळे वाढला आहे. एकबुरुजी वस्ती, वेताळ बाबा वस्ती, पहिलवान बाबा वस्ती परिसरात रानडुकरांनी धुडघुस घातला आहे.

कित्येकदा कुत्र्यांवर आणि शेतकऱ्यांवर हल्ला केला. मशागत, पेरणी, बियाणे, व्यवस्थापन, काढणीच्या खर्च वाढला आहे. आता शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी शेतीला कुंपण करणे, जाळ्या लावणे अनिवार्य बनत चालले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe