प्रगतशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांना राज्यस्तरीय शेती रत्न पुरस्कार जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने प्रगतशील शेतकरी म्हणून सोमेश्‍वर श्रीधर लवांडे यांना राज्यस्तरीय शेती रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. अकादमीच्या गुणीजन गौरव महापरिषदच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो.

2021 या वर्षाचा शेती रत्न पुरस्कार लवांडे यांना 5 ऑगस्ट रोजी नाशिकला पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. श्रीधर लवांडे हे फत्तेपूर (ता. नेवासा) येथील असून, ते मागील आठ ते नऊ वर्षापासून विदेशातून जनावरे, चारा, बियाणे महाराष्ट्रात आणून नवनवीन प्रयोग करत आहे.

त्यांनी थायलंड, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंडोनेशियातील विदेशी चारा, बियाणे आणून आपल्या मातीत यशस्वीपणे लागवड केली आहे. त्यांचा हा प्रयोग बघण्यास संपुर्ण भारतातून शेतकरी येऊ लागले आहेत. या कार्याबद्दल त्यांचा राज्याचे कृषी मंत्री ना.दादासाहेब भुसे व ना. शंकरराव गडाख यांच्या हस्ते सन्मान झाला आहे.

टाळेबंदी काळात शेतात विविध प्रयोग करुन विदेशी चार्‍यातून त्यांनी एक एकर शेतीतून 20 ते 25 लाखाचे उत्पन्न मिळवले. त्यांच्या चारा अभियानाला देशभरातून मागणी वाढत आहे.

या कार्याची दखल सर्व माध्यमांनी घेतली आहे. या कार्याबद्दल लवांडे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने पुरस्कार जाहीर केला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe