अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्ह्यातील संगमनेर आणि पारनेर या तालुक्यांत कोरोना पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या साकूर जिल्हा परिषद गटातील 20 गावात 31 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सरपंच यांनी घेतला आहे. नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे.
संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील 20 गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, झेडपी सीईंओ डॉ. राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरूवारी संगमनेर तालुक्यात भेट दिली आहे.
तालुक्यातील वाढत करोना संसर्ग रोखण्यासाठी या जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी यांनी 8 ऑगस्टपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. तसेच या भागातून काही मजूर जुन्नर तालुक्यात रोजगारासाठी जात असून त्यांची दररोज चाचणी करण्यात येणार आहे.
इतर जिल्ह्यांत भाजीपाला घेवून जाणार्या वाहन चालकांच्या विलगीकरणाची व्यवस्था साकूर भागात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम