अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- कोरोनामुळे सततच्या लाॅकडाऊन व निर्बंधांमुळे नगर शहरात मागील १६ महिन्यांत हॉटेल व्यवसायाला सुमारे ३०० कोटींहून अधिकचा फटका बसल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांकडून देण्यात आली. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हॉटेल व्यवसायाचा आर्थिक कणा मोडला असून, हॉटेल व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून हे ग्रामीण अर्थकारण थांबले आहे. हॉटेल, विविध व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोनाचा संसर्ग व त्यानंतर लागलेला लॉकडाऊन यामुळे हॉटेल्स व्यवसाय मोडून पडला आहे.
हाॅटेल व्यवसाय केवळ निवास आणि भोजनाची सुविधा एवढ्यापुरताच मर्यादित नसून, अन्य ५० हून अधिक व्यवसायांशी जोडलेला आहे. दूध, भाजीपाला, बेकरी उत्पादनांवरही याचा परिणाम झाला आहे. सध्या दुपारी चारपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास मुभा आहे. तसेच पार्सल सुविधा पुरविण्यासही परवानगी आहे.
परंतु, दिवसभर व्यवसाय होत नाही. ग्राहक रात्रीच्या वेळी जेवणासाठी येतात. पण, रात्री हॉटेल बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. हॉटेलचा परिसर मोठा आहे. रात्रीच्या वेळी नियमांचे पालन करून हॉटेल सुरू ठेवणे व्यावसायिकांना शक्य आहे. वेळोवेळी मागणी करून रात्री हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली जात नाही.
त्यामुळे कामगारांचा पगार, वीज बिल, साफसफाई हा सर्व खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न सध्या हॉटेल व्यावसायिकांना भेडसावत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम