अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-संगमनेर येथील कारागृहातील काही कैद्यांची मनमानी वाढली आहेत. कारागृहातील कच्च्या कैद्यांना मारहाण करणे, बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ करणे असे प्रकार या कैद्यांकडून होत आहे.
याशिवाय परवानगी नसतानाही मोबाईल वापरण्याचे कामही ते करत आहेत. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याला खेटूनच काही वर्षांपूर्वी नवीन कारागृह बांधण्यात आले आहे. या कारागृहामध्ये 24 कैद्यांची क्षमता आहे. मात्र अनेकदा या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी ठेवलेले असतात.
यामध्ये जुने व नवीन कैदी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत आहेत. या कारागृहात जुन्या कैद्यांची चांगलीच चलती आहे. नवीन कैद्यांंसह ते कधी कधी कारागृहात बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवरही दादागिरी करतात. या कैद्यांना कारागृहात अनेक सुविधा मिळत असतात. गुटखा, तंबाखू व इतर व्यसनांचे पदार्थ त्यांना सहज उपलब्ध होतात.
या वस्तू कोण पुरवतात याबाबत अनेकदा उलटसुलट चर्चा होत असते. तसेच गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या कारागृहामध्ये एक छोटासा मोबाईलवापरला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त हातील आले आहे. नेहमी सायलेंट मोडवर असणारा हा मोबाईल संबंधित कैदी रात्रीच्यावेळी वापरतो.
दुसरे कैदीही या मोबाईलचा वापर करत असल्याचे चर्चा आहे. कारागृह बंदोबस्तासाठी नेहमी वेगवेगळ्या पोलिसांची नियुक्ती करण्यात येत असते. तुरुंग अधिकारीही कधीकधी कारागृहात येत असतात. असे असतानाही मोबाईल बाबतची माहिती कोणाच्याही लक्षात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संबंधित कैद्याला हा मोबाईल दिला कोणी याबाबत चौकशी होण्याची गरज आहे. मात्र तुरुंग अधिकार्यांचेही दुर्लक्ष झाल्याने कारागृहात अनेक गैरप्रकार होताना दिसत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम