जिल्ह्यातील ‘त्या’ महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा परिषद सरसावली !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- कोरोनात विधवा झालेल्या नगर जिल्ह्यातील महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या महिलांच्या पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त योजना राबवण्यात येतील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर  यांनी दिले.

काल जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्या पुढाकाराने  मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, समितीचे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. समितीच्या सदस्यांनी या विधवा महिलांचे सर्वेक्षण होण्याची गरज मांडली व तालुका स्तरावर या महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असलेल्या समितीची गरज मांडली.

त्याचप्रमाणे बालसंगोपन योजना यशस्वी होण्यासाठी प्राथमिक माध्यमिक शाळा अंगणवाडी यांच्या मदतीने लाभार्थी चे फॉर्म भरून ११०० रु चा लाभ देणे, अंगणवाडी भरती व जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांमध्ये या विधवा महिलांना प्राधान्यक्रम द्यावा.15 व्या वित्त आयोगात  महिलांसाठी खर्च करायची जी रक्कम आहे त्या रकमेचा खर्च या महिलांवर करण्यात यावा.

संजय गांधी निराधार योजनेचे कॅम्प  बाजाराच्या गावी लावण्यात यावेत. अशा विविध मागण्या केल्या.या प्रत्येक मागणीवर चर्चा करून त्या प्रत्येक मागणीला संबंधित खाते प्रमुखांशी चर्चा करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या टास्क फोर्सने  आदेशित केल्यास जिल्हा परिषदेच्या यंत्रणे मार्फत या महिलांचे सर्वेक्षण करण्यात येईल व तालुका स्तरावर या कामासाठी समितीचाही विचार करण्यात येईल असे सांगितले..

बाल संगोपन योजनेत जिल्ह्यातील प्रत्येक गरज मुलाचा समावेश करण्यात येऊन अंगणवाडी भरती विविध योजना मध्ये या महिलांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल या महिलांचा त्यांच्या गावातील बचत गटांमध्ये समावेश करण्यात येऊन रोजगाराचे प्रशिक्षण या महिलांना दिले जाईल असे सांगितले. संजय गांधी निराधार योजनेच्या बाबत बाजाराच्या गावी कॅम्प लावायला अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe