अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच पुन्हा निर्बंध कडक होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि आपत्ती निवारण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. ‘प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे.
त्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेतून जे अनुभव आले, ते लक्षात घेऊन सज्जता ठेवण्यात आली आहे. राज्यातील निर्बंध आता शिथील करण्यात आलेले आहेत.
तरीही नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. राज्यात पुरेशा ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. केंद्राकडून जास्तीचा ऑक्सिजन मिळण्याची शक्यता नाही.
त्यामुळे ज्यावेळी राज्याची ऑक्सिजनची गरज ७०० टनावर जाईल, त्या दिवसापासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत,’ असं मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तनपुरे बोलत होते. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री करोनाच्या बाबतीत अत्यंत सावधगिरीने पावले उचलत आहेत. काही राजकीय पक्ष यामध्येही राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
विरोधक काहीही टीका करीत असले तरी लोकांसाठी काय महत्त्वाचे आहे, याचा विचार करून मुख्यमंत्री संयमाने परिस्थती हातळत आहेत.
लोकांचे जीव वाचविण्यासाठी काय करता येईल, याचे निर्णय ते परिस्थितीचे भान राखून घेत आहेत. त्यामुळे माझा मुख्यमंत्र्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला आहे.’
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम